Thursday, July 23, 2015

आयुष्यात विशेष काही घडल नाही?: किल्ले राजमाची । Kille Rajmachi

किल्ले राजमाची । Kille Rajmachi:                    राजमाची म्हटलं कि डोळ्यासमोर ऊभ राहत ते निसर्गाच एक अद्भुत रुप. हिरवा शालू ...

किल्ले राजमाची । Kille Rajmachi

 








 

 



       राजमाची म्हटलं कि डोळ्यासमोर ऊभ राहत ते निसर्गाच एक अद्भुत रुप. हिरवा शालू परिधान केलेली धरणी आणि तिच्या रूपावर भाळून असंख्य हातांनी तिला भिजवणारा वरुणेंद्र! ऐन पावसाळ्यात राजमाची ट्रेक म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच, गिरीविहंग ट्रेकर्स तर्फे किल्ले राजमाची ट्रेक १८ आणि १९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. मी सुहास पवार या ट्रेकचा नेता आणि सिद्धेश, पूजा, वीरेंद्र, अनिल, प्रसाद, कृष्णा या ट्रेकचा उपनेता म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.
ट्रेकला जाण्यापूर्वी सदस्य संख्या ९ इतकी होती, यात हेतल, दिपेश, आरती, प्रथमेश, संदीप हे सभासद नवीन होते. हि माझी राजमाचीला पाचवी भेट असल्याने माझ्यावर अगदीच जास्त दडपण नव्हत परंतु अगदीच नव्हत असहि नाही. बरीच मंडळीने हा ट्रेक केला होता, बाकी सर्वांचा हा पहिलाच अनुभव ठरणार होता.
ट्रेकला जाण्यासाठी घरून निघताना देखील एकूण सदस्य संख्या ९ होती, कल्याण पोहोचेपर्यंत हीच सदस्य संख्या ११ झाली! सदस्य संख्या वाढली तरी विशेष काही अडचण येणार नव्हती हे माहित असल्याने आम्ही नवीन सदस्यांना ट्रेकला येण्याची संधी दिली.
       
     कल्याण ला पोहोचून आम्हाला रात्रौ १०:५५ ला सुटणारी पंढरपूर प्यासेंजर पकडायची होती. आम्ही पुढे जाऊन लोणावळ्यापर्यंत प्रत्येकी २० रुपयाचे तिकीट काढले. हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते कारण लोणावळ्यापर्यंत ७५ रुपयाचे तिकीट सुद्धा मिळते पण ते एक्स्प्रेस गाड्यांसाठी आहे. लोणावळ्यापर्यंतच जायचे असल्यास २० रुपयाचे तिकीट पुरेसे आहे!
एक एक करून कल्याण येणारी सर्व मंडळी जमा झाली. गाडी बरोबर १२:०० ला फलाट क्रमांक ४ वर आली. शुक्रवार असल्याने विशेष गर्दी नव्हती. आम्हाला सर्वांना बसण्यास तसेच झोपण्यास ऎस पैस जागा मिळाली. गाडी ५ मिनिटे उशिरा म्हणजेच १२.१०वाजता सुरु झाली. गणपती बाप्पांना उचकीच निमित्त देऊन राजमाचीच्या दिशेने पहिलं चाक फिरलं! गाडी निर्धारित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिरा लोणावळ्याला पोहोचली. पहाटे २:२० मिनिटांनी आम्ही लोणावळा प्रवेश केला. तिकीट खिडकीच्या आवारात आम्ही पहाटे २:३० पर्यंत बस्तान मांडायचं ठरवलं. लगेच बरेचजणांनी जमीन जवळ केली. कुत्र्यांच्या लयबद्ध भुंकण्याला मधूनच ये-जा करणारे इंजिन अप्रतिम साथ देत होते. यामुळे झोपण्याच्या बेतावर मुसळधार पाऊस पडला, यातही काही जणांना झोप लागलीच, दांडगी इच्छाशक्ती कदाचित हिच! पाठीला शक्य तितका आराम देण्याचा मानस सर्वांचाच होता, त्यामुळे उठण्याचे कष्ट जास्त घेतले नाहीत. बहुतेक डासांचा श्रावण चालू झाला होता त्यामुळे अंग खाजवत उठण्यापेक्षा डोळे चोळत पहाटे ३:०० वाजता सर्वजण कृत्रिम झोपेतून उठले.आता २ दिवस सोबत करणाऱ्या सहकाऱ्यांचा मुखनामपरिचय करून घेतला. ठीक: ३: ३०  वाजता लोणावळा रेल्वे स्थानक सोडलं. थोड्याच वेळात लोणावळा एस. टि स्थानकावर पोहोचलो. तेथील उपहारगृह नुकतच चालू झाल होत. हे उपहारगृह पहाटे ५ ते सकाळी ६ या एका तासासाठीच बंद असते. आम्ही ३:३० वाजता राजमाचीकडे कूच केली.. आम्ही धरण चढून वर गेलो आणि पावसाने आमचे जंगी स्वागत केले. तुंगार्ली गाव मागे टाकून आम्ही मुळ रस्त्याला लागलो. मागील काही दिवसापासून बरसणाऱ्या पावसाने अजिबात आखडता हात घेतला नव्हता. झाडांना नवीन पालवी देत जुन्या पानांवरची धूळ त्याने साफ केली होती. सृष्टी जणू तरारली होती. भल्या पहाटेसुद्धा ती जागी होती! कदाचित आम्ही येत आहोत याची पूर्वकल्पना तिला असावी! वाटेत लागणाऱ्या लहान मोठ्या ओढ्यांमध्ये यथेच्छ भिजत प्रवास सुरु होता. सोबत आलेला कॅमेरा सुद्धा स्वतःच काम उत्तम बजावू लागला. उल्हास दरीत कोसळणाऱ्या धबधब्याचे मनोहारी दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्यासाठी आम्ही श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या तळाच्या जागी पोहोचलो. परंतु धुक्याने हिरमोड केला. काहीही झाल तरी हा धबधबा पाहायचाच असा माझा निश्चय होता पण १० मिनिटे थांबूनदेखील धुक काही हलत नव्हत. जोर जोरात श्वास घेतले, बेंबीच्या देठापासून फुंकर मारली पण धुक काही हलेना! हताश मनाने तिथून निघण्याचा निर्णय घ्यावा लागला पण तितक्यात धुक ओसरू लागल, जणू ईश्वराने माझी मर्जी मान्य केली. या वेळीचा धबधबा अधिक रुंद होता. ते नयनरम्य दृश्य हर प्रकारे साठवत आम्ही धबधब्याचा निरोप घेतला. अजून किती? और कितना? असे प्रश्न विचारणाऱ्या सदस्यांच्या ओठी १५ मिनिटे ऐकल्यावर स्मित अवतरले. पण याच १५ मिनिटात आम्ही संपूर्ण ट्रेक मधील सर्वाधिक पाऊस अनुभवला, टपोरे थेंब आणि त्याचा एकसंध वेग याने अतिउच्च सीमा गाठली. मी अनुभवलेला आता पर्यंतचा अति-मुसळधार पाऊस असं म्हटल्यास काही वावग ठरणार नाही. पुढील १५ मिनिटात श्री. सावंत  यांच्या उधेवाडी गावातील घरी पोहोचलो. मध्यान्ह टळून अर्धा तास झाला होता!
         ७ तासात आम्ही लोणावळा ते उधेवाडी हा प्रवास पूर्ण केला. कोणीही ओले कपडे बदलू नये अशी सूचना दिली होती कारण जेवण करून लगेचच श्रीवर्धन आणि मनरंजन हे बालेकिल्ले पाहण्याचा बेत होता. आम्ही सोबत आणलेले डबे उघडले गेले. गटारी साजरी होते का हा प्रश्न मनात घर करत असतानाच निलेशने कोंबडी वडे बाहेर काढले आणि थोड्याच वेळात ते कोंबडी वडे गायब पण झाले! बाकी जिन्नसावर आडवा, उभा, तिरका हात मारत मोहीम फत्ते झाली. काही सदस्यांनी आता देखील ओले कपडे घालून झोपणे पसंत केले. थोडी सुस्ती आली होती ती झटकण्यासाठी चहाची मागणी झाली. जेवणानंतर तासाभरात चहा घेऊन ३ च्या सुमारास आम्ही मनरंजनच्या वाटेला लागलो. मनरंजन आणि श्रीवर्धन कडे जाणारी वाट आता सिमेंटचा हायवे झाला आहे. त्यावरून आम्ही बालेकिल्ल्यांच्या मध्यभागी असणाऱ्या मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरामागून मनरंजन सर केला. प्रवेशद्वारात स्वराज्याचे अधिपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत प्रवेश केला. माझ्याकडील तुटपुंजी माहिती देऊन मनरंजन पुढील २० मिनिटांनी सोडला. मनरंजन उतरून, श्रीवर्धन चढेपर्यंत मिनिट काट्याने घड्याळात अर्धवर्तुळ केल होत. श्रीवर्धनवरील उंच बुरुजावर जाऊन गिरीविहंगचा शिलेदार सुशांत निकमयाने आणलेला भगवा फडकवला. पुढील ३० मिनिटांनंतर राजमाचीवरील ऊंच बालेकिल्ल्याला वंदन करून निरोप घेतला. खालील मंदिराजवळ सायंकाळी ५:३० वाजता पोहोचलो. आजच पुरातन मंदिर आणि त्याचा परिसर पाहून घेऊ असा एकमुखी निर्णय घेतला. मंदिर पाहण्यात सर्व रमले, त्याच वास्तुशिल्प न्याहाळण्यात मग्न झाले. साधारण अर्धा तास मंदिराला देऊन तेथून काढता पाय घेतला. सायंकाळी ६:३० च्या सुमारास पहिल्यांदा शरीर सुक झाल! कोसळणारा पाऊस, थंडगार वारा, अल्लाददायक वातावरण आणि गरम सूप! व्वा!! दोन ते तीन फेऱ्या झाल्यावर  सर्व सूप संपल. जेवणाची वेळ सांगून आमच्या गप्पा सुरु झाल्या. अनुनभवी सदस्यांकडून अनुभव कथनाचा कार्यक्रम उरकला. सुचानांपेक्षा जास्त शाबासकी होती म्हणून हायस वाटलं! ९ वाजता जेवण आलं. दोन भाज्या, तांदळाची भाकर, वरण, भात, लोणच, पापड, ठेचा असा बेत होता. सर्वांचीच कामगिरी उल्लेखनीय होती. अन्न कोणीही वाया घालवाल नाही! पोटात वजन जाताच शरीर धरणीवर वजन टाकायला मोह करू लागलं. त्याचा पण मोह पुरवला. साधारण ११ वाजता सर्व झोपी गेले. आम्ही मोजकीच मंडळी गप्पांमध्ये रंगलो! १:३० कधी वाजले कळलंच नाही आणि नंतर ७:३० कधी वाजले ते तर अजिबात कळल नाही!
सकाळी ७:३० वाजताच जाग आली आणि गजर वाजण्याआधीच बंद करण्याची अतिशय दुर्मिळ घटना घटली. रात्रभर पाऊस स्वतःचा जोर दाखवत होता सकाळी देखील तो गर्जना करतच राहिला. आन्हिक आवरून आम्ही तयारीला लागलो चहा घेतला त्यासोबत बिस्कीट असा नाश्ता होता कारण तासाभरात जेवून कर्जतला उतरायचे होते. कोणत्याही गोष्टीला हश्या पिकत होता अनोळखी चेहरे आता एकमेकांत रमत होते. ११ वाजता जेवायला बसलो. कोबीची भाजी, पिटल, तांदळाची भाकर, मसुराची डाळ, भात, पापड, लोणच आणि ठेचा असा बेत होता. जास्त जेवण जात नव्हत पण खाण्याशिवाय गत्यंतर नव्हता. जेवून पुन्हा ओले कपडे परिधान केले आणि १२ च्या ठोक्याला गड सोडल.