सिंधुदुर्गला जाण्यासाठी मालवणनगरीत जावे लागते. तारकर्लीपासून मालवण अगदीच जवळ म्हणजे सहा किलोमीटरवर आहे. तालुक्याचे ठिकाण असलेली ही लहानशी शहरवजा नगरी म्हणजे खास कोकणची ओळख.
अगदी नाममात्र शुल्कात कोळी संघाने ही शासनमान्य सेवा उपलब्ध केली आहे. भरती-ओहोटीची वेळ पाहून किल्ल्यापासून किती दूरवर उतरावे लागेल, याची कल्पना आपल्याला दिली जाते. डिझेलचे इंजिन असलेल्या आणि एका बाजूने तोल सांभाळण्यासाठी लाकडी ओंडका बांधलेल्या या होडीची सफर म्हणजे मोठी मौज असते. साधारण दहा ते बारा जण एका होडीत बसू शकतात. मंद गतीने समुद्राच्या लाटा कापत जाणारी नाव, तिला दिशा देणारा नाखवा, बोटीत बसून हाताशी लागणारे समुद्राचे थंड पाणी, नाखव्याचा सूर लागला तरी त्याने गाइलेली मालवणी गाणी अशा वातावरणात आपण वीसेक मिनिटांत सिंधुदुर्गाच्या दरवाजाशी पोचतो. अगदी समोर गेल्याशिवाय बाकी कुठूनही न दिसणारा हा दरवाजा त्या काळी बांधलेल्या जलदुर्ग वास्तुकाराच्या बुद्धीची झेप आणि कौशल्याची साक्ष देतो.
शिवरायांनी स्वराज्याच्या वैभवशाली सुवर्णकाळात बांधून काढलेला जलदुर्ग. सिद्दीच्या अभेद्य आणि अजिंक्य जंजिऱ्याला पर्याय म्हणून हा जलदुर्ग शिवरायांनी इसवीसन 1664 मध्ये बांधून घेतला. खवळलेल्या समुद्रात असलेले आणि अजस्र जहाजेही फोडणारे खडक, बेटावर जाण्यासाठी अतिशय "जिकिरीचा आणि अनुभवी खलाश्यांनाच माहीत असणारा जलमार्ग या गुणवैशिष्ट्यांमुळे शिवरायांनी "कुरटे' बेटाची निवड स्वराज्याचा आरमारी तळ आणि जलदुर्ग बांधण्यासाठी केली. पायात ओतलेले शिसे, दोन हजार खंडी लोखंड, जवळच्याच बेटांवरून सागराला आव्हान देणारे खडक फोडून घडवलेले दगड, तीस फूट उंच आणि बारा फूट रुंद तटबंदी यांमुळे हा किल्ला जिंकणे शत्रूला स्वप्नवतच आहे. सिंधुदुर्गात आवर्जून पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. किल्ल्याचा एकूण पसारा 48 एकरांचा आहे आणि तटबंदीची लांबी दोन मैल. किल्लाबांधणीला एकूण तीस वर्षे लागली. किल्ल्याची बांधणी पाहताना शिवरायांच्या दूरदृष्टीची साक्ष पदोपदी पटते. दरवाजाची रचना, एकूण 52 बुरुज, वळणावळणांची तटबंदी यांमुळे हा किल्ला खरेच जाणत्या राजाने बांधलाय याची खात्री पटते. त्याची पावती म्हणूनच की काय त्यांचे पुत्र राजाराममहाराजांनी किल्ल्यात शिवरायांचे मंदिर बांधले आहे. शिवराजेश्वर मंदिर या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे.
विश्वात एकमेव असलेल्या या शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांच्या वापरातील अवजड समशेर आहे. ही समशेर पूजेला उचलण्यासाठी आज दोन माणसांची आवश्यकता भासते. मंदिरात दाढी नसलेली शिवरायांची मूर्ती खलाशाच्या वेशात आहे. किल्ल्यात एका ठिकाणी शिवरायांच्या हातांचे आणि पावलांचे ठसे आहेत. तिथे नतमस्तक होऊन आपण किल्ला पाहायला बाहेर पडलो की आणखी काही आश्चर्ये दृष्टीस पडतात. चोहोबाजूंनी समुद्राचे खारे पाणी असतानाही किल्ल्यात गोड्या पाण्याच्या बारमाही विहिरी आहेत. दक्षिण तटबंदीला लागूनच खाली एक लहानसा वाळूचा किनारा आहे.त्याला "राणीची वेळा' (राणीचा खासगी किनारा) असे म्हणतात. इथे शिवरायांच्या स्नुषा राणी ताराबाई समुद्रस्नानाचा आनंद लुटत असत. किल्ल्याच्या परिसरात दुर्मिळ असे इंग्रजी "वाय' आकाराचे नारळाचे झाड आहे. त्यातल्या एका फांदीवर काही वर्षांपूर्वी वीज पडल्याने ती जळाली आहे.
किल्ल्याच्या तटावरून दिसणाऱ्या पद्मगड किल्ल्याला सिंधुदुर्गची ढाल समजली जात असे. पद्मगडावरच शिवकालीन आरमाराचे जहाजबांधणी केंद्र असे. तटावरून आसपासचा मालवण-तारकर्लीचा सागरतीर, खाली सागराच्या पाण्यात हेलकावणाऱ्या होड्या असे विहंगम दृश्य दिसते. ते मनात साठवूनच परतीची होडी पकडून मालवणात परतायचे.
आजचाही मुक्काम मालवणात करून मालवण रॉक गार्डन, आरसेमहाल बीच, बॅ. नाथ पै सेवांगण, प्रसिद्ध पिंपळाचे झाड, भराडीदेवी, धामापूर तलाव पाहायचा. खास मालवणी मिठाई म्हणजे मालवणी खाजा, कोंबडी-वडे, मालवणी मासळी यांचा आस्वाद घ्यायचा आणि सायंकाळी पुन्हा सिंधुदुर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारा सूर्योदय पाहून आणखी एक अविस्मरणीय दिवस गाठीशी जोडायचा.
उपयुक्त माहिती:
रस्ते:
- पुणे-सातारा-कोल्हापूर-राधानगरी-कणकवली-कसाल-मालवण
- वेंगुर्ला-निवती-भोगवे-देवबाग-तारकर्ली-मालवण
- मुंबई-चिपळूण-कणकवली-कसाल-मालवण.
- मुक्कामाची सोय: तारकर्ली, मालवण येथे बरीच निवासी हॉटेल्स आहेत.
- जेवणाची सोय: पुष्कळ हॉटेल्स आहेत; पण शाकाहारी भोजनात बटाटा, कोबी, मटकी, वरण असे मर्यादित पर्याय उपलब्ध. सामिष पदार्थांमध्ये मालवणी कोंबडी-वडे, मासळी चुकवू नका.
आसपासचा परिसर:
तारकर्ली
कुणकेश्वर
विजयदुर्ग
देवगड
आजरा
-- सुहास पवार --
No comments:
Post a Comment